Uncategorized

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांचा घात; दोषी कंपन्या व विक्रेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी ..

दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत; तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन

रघुनाथ सोनकांबळे….

यंदा उशिराने दाखल झालेल्या मान्सूननंतर मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र अनेक कंपन्यांच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याने हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले असून त्यातून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या, घाऊक वितरक आणि तालुक्यातील विक्रेत्यांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) नायगावचे तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर यांनी तालुका कृषी अधिकारी, नायगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात इनोव्हेज INV-108, बूस्टर सीड, एसकेबी सीड, जेएस सीड, परवशा सीड, रवी सीड, व्हिगोर सीड, श्री श्री सीड, सफल सीड, ज्ञानदीप सीड आणि अंकुर सीड्स आदी कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण अत्यंत कमी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नांदेड येथील घाऊक वितरक तसेच नायगाव तालुक्यातील काही विक्रेत्यांनी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्रीस आणल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

बियाण्यांची कायद्यानुसार आवश्यक उगवण क्षमता असणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बियाणे उगवलेच नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करावी लागत असून त्यासाठी बियाणे, मशागत, मजुरी व इतर खर्चाचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.

आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर हा आणखी एक अन्याय असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.बियाणे कायदा 1966 व बियाणे नियम 1968 मधील संबंधित तरतुदींचे उल्लंघन करून निकृष्ट बियाण्यांचे उत्पादन, वितरण व विक्री करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून संबंधित कंपन्या व विक्रेत्यांविरोधात तातडीने फौजदारी कारवाई करून फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, तसेच शेतकऱ्यांना प्रथम पेरणी व दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च भरपाई स्वरूपात मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नाही, त्यांनी खरेदीची पावती, बियाण्याच्या बॅगेवरील टॅग आणि आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी, नायगाव यांच्याकडे तातडीने लेखी तक्रार दाखल करण्याचे आवाहनही होटाळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button