पार्किंगची सोय नाही; मग दंडाचा धुमधडाका कशासाठी?नायगाव शहरात ‘नो पार्किंग’च्या नावाखाली वाहनधारक हैराण;

रघुनाथ सोनकांबळे……..
नायगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहन पार्किंगची कोणतीही ठोस व्यवस्था नसताना ‘नो पार्किंग’च्या नावाखाली वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली जात असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “वाहन उभे करायला जागा नाही, पार्किंगची व्यवस्था नाही; मग वाहनधारकांनी करायचे तरी काय?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नायगाव शहर हे परिसरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने दररोज बाहेरगावाहून मोठ्या संख्येने दुचाकी व इतर वाहने खरेदी-विक्री तसेच विविध कामांसाठी शहरात येतात. मात्र बाजारपेठ परिसरात नगरपंचायतीकडून अथवा संबंधित दुकानदारांकडून वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने नागरिकांना नाईलाजाने रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. त्याच वाहनांवर पोलिसांकडून ‘नो पार्किंग’ची कारवाई केली जात असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे.
पार्किंगची जागा नाही, पण दंडाची पावती मात्र तयार!
वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार, बाजारपेठेत काही मिनिटांसाठी खरेदी करण्यासाठी वाहन उभे केले तरी पोलिसांकडून कारवाई केली जाते. काही प्रकरणांत दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात असल्याने सर्वसामान्य वाहनधारक आर्थिक अडचणीत सापडत आहेत.वाहनधारकांचा सवाल असा की, “शहरात नियोजित पार्किंगची जागाच नसेल, तर नागरिकांनी वाहने कुठे उभी करायची? पार्किंगची सुविधा निर्माण न करता केवळ दंड वसुलीवर भर देणे हा वाहतूक व्यवस्थेचा उपाय कसा ठरू शकतो?
केसेसचा टार्गेट’ असल्याची चर्चा;
पोलिस प्रशासनाने स्पष्टता द्यावीदररोज ठरावीक संख्येने नो पार्किंगच्या केसेस दाखल करण्याबाबत वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज २० ते २५ नो पार्किंगच्या कारवाया करण्याचे लक्ष्य दिले जात असल्याची माहिती मिळते. या चर्चेत तथ्य किती, हे संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे.

जर कारवाईचा उद्देश वाहतूक शिस्त राखणे असेल, तर आधी पार्किंगची समस्या सोडविणे आणि त्यानंतर नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा अधिक व्यवहार्य मार्ग ठरू शकतो. अन्यथा ‘पार्किंग नाही, पण पावती मात्र आहे’ अशी विचित्र परिस्थिती निर्माण होते.
नगरपंचायत प्रशासनाची जबाबदारी कुठे?शहरातील वाढती वाहनसंख्या आणि
बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता नियोजित पार्किंगची व्यवस्था करणे ही स्थानिक प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र नायगाव शहरात पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी, रस्त्यावरील अस्ताव्यस्त वाहने आणि त्यातून होणाऱ्या कारवाया हा रोजचा विषय बनला आहे.
नगरपंचायतीने शहरातील उपलब्ध जागांचा सर्वेक्षण करून स्वतंत्र वाहनतळ निश्चित करावा, पार्किंगचे फलक लावावेत आणि बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
दुकानदारांनीही जबाबदारी स्वीकारावी बाजारपेठेतील अनेक दुकानांसमोर ग्राहकांची वाहने उभी राहत असली, तरी ग्राहकांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत दुकानदारांकडून अपेक्षित पुढाकार घेतला जात नसल्याची नागरिकांची नाराजी आहे. ग्राहकांना बोलावायचे, पण त्यांच्या वाहनांची जबाबदारी घ्यायची नाही, अशी परिस्थिती राहिल्यास समस्या आणखी गंभीर होणार आहे.



