Uncategorized
कुस्नुर एमआयडीसीत बिबट्याचा थरार! कामगारावर पाठीमागून हल्ला; परिसरात दहशतीचे वातावरण वनविभाग व पोलिसांची तातडीची मोहीम सुरू — नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव..
29 नोव्हेंबर 2025
कुस्नुर एमआयडीसी परिसर आज दुपारी अक्षरशः हादरून गेला, जेव्हा सिट्रीच कंपनीसमोर काम करणाऱ्या एका तरुण कामगारावर पाठीमागून बिबट्याने अचानक हल्ला केला. दुपारी सुमारे 4.00 ते 5.00 च्या दरम्यान घडलेल्या या घटनेत कामगार गंभीर जखमी झाला असून, या बातमीने संपूर्ण एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटना कळताच कुंटूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा शोध घेण्यासाठी पिंजरे व आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यात आले असून, परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या भीतीने स्थानिक नागरिक, कामगार व कर्मचारी मोठ्या प्रमाणात बाहेर येण्यास टाळाटाळ करत आहेत. जखमी कामगार सिट्रीच कंपनीसमोर रक्तबंबाळ अवस्थेत दिसून येताच लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे, कुस्नुर एमआयडीसी परिसरात कोणतेही जंगल नसतानाही बिबट्या या परिसरात आलाच कसा हा शरीराचा धक्का प्रश्न या परिसरात चर्चिला जात आहे.

बिबट्या या परिसरात आलाच असेल तर त्यांना या परिसरात लपण्यासाठी केवळ घुंगराळा येथील खंडोबा मंदिर ,गंगनबीड येथील महादेव मंदिर, आणि निळेगव्हाणचा काहीपट्टा या परिसरातील जंगल हेच जवळचे नैसर्गिक अधिवास असल्याने बिबट्या या भागात वास्तव्यास राहू शकतो अशी दाट शक्यता आहे. परंतु या कुष्णूर एमआयडीसी परिसरात किंवा नायगाव तालुक्याच्या आसपास कुठेही जंगल नसताना बिबट्या या परिसरात आलाच कसा किंवा कोणी आणून सोडले का असा स्थानिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरीदेखील कुंटूर पोलिस व वनविभागाने नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की—परिसरात अनावश्यक फिरू नये .कुठेही बिबट्या दिसल्यास तातडीने पोलिस किंवा वनविभागाला माहिती द्यावी
अफवांवर विश्वास ठेवू नये .
कामगार, मजूर, नागरिकांनी प्रशासनाला शक्य ती मदत करावी
डांगोरी 24 तास या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून संपादक रघुनाथ सोनकांबळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. की कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका. घटना, हालचाल किंवा परिस्थिती बदलल्यास तातडीने संबंधित पोलीस स्टेशन, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील किंवा तहसीलदार यांना कळवा, जेणेकरून पुढील धोका टाळता येईल.


