Latest Newsआपला जिल्हानांदेडमुखेड
बिबट्याचा धुमाकूळ! मुखेड तालुक्यात भीतीचे सावट बोमनाळी गावात शाळेजवळ ४ शेळ्यांचा बळी; वनविभागाकडून तात्काळ जेरबंदीची नागरिकांची मागणी

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव….
मुखेड तालुक्यातील बोमनाळी गावात आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास बिबट्याने जोरदार हल्ला चढवत ४ शेळ्यांचा बळी घेतला. हा हल्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील नवी आबादी केंद्र ब्रांच परिसरात झाल्याने गावात भीतीचे वातावरण अधिकच दाटून आले आहे. हल्ल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर नागरिकांनी पोलिस प्रशासन, तहसील कार्यालय व वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील नायगाव, बिलोली, मुखेड, देगलूर या भागांत गेल्या काही दिवसांत बिबट्याचे दर्शन झाल्याने अनेक गावांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे. शेतात काम करणाऱ्या महिला, शेतजमिनीवर रात्रभर जागणारे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक प्रचंड भीतीत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी आवाहन केले आहे की—
“बिबट्याचा वावर सातत्याने दिसत असल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगावी. मुलांना एकटे बाहेर पाठवू नये आणि रात्रीच्या वेळी शेतावर जाण्यापूर्वी सुरक्षिततेची काळजी घ्यावी.”




