
नायगाव तालुका प्रतिनिधी..
कहाळा …कलियुगातील प्रत्येक मानव सुखाच्या शोधात लागला आहे. अशा परिस्थितीत परमार्थापासून तो कोसोदुर जात आहे. परंतु प्रपंच करूनच परमार्थ करावा. जीवनातील प्रत्येक क्षण चिंतनात घालवावा असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प वासुदेव महाराज कोलंबीकर यांनी केले आहे.
नायगाव तालुक्यातील कहाळा येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत महाराज संस्थानात आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात ते बोलत होते.
हभप कोलंबीकर महाराज पुढे म्हणाले, आपले आयुष्य खूप कमी आहे. भगवंतांनी दिलेल्या आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण चिंतनात जावा. यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संसार हा पुढे पुढे सरकतो. त्यात आपले आयुष्य संपले तरी संसार काही संपत नाही. म्हणून संसार करतच परमार्थ करावा. प्रत्येक संतानी संसारातून परमार्थ शोधला असून त्यातून भगवंताची प्राप्ती करून घेतली आहे. आपले आयुष्य कमी आहे. पूर्वी आयुष्य खूप मोठे होते. परंतु भगवंतांनी दिलेल्या आपल्या या छोट्या आयुष्यात चांगले कर्म करण्याची आवश्यकता आहे. बालपण तरुणपण तसेच जात आहे. आपण चिंतन करत नाही त्यामुळे दुःख येत आहेत. अंतकरण शुद्ध ठेवावे. नेहमी नामस्मरण करावे. शरीराला जेवले सोशल तेवढेच करावे. जास्त धन संपत्तीचा हव्यास करू नये. ज्ञानाचा वापर करावा. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग साधना करावी. नामस्मरण करावे. युक्त आहार विहार असावा. पशु पक्षाला ज्ञान प्राप्त करता येत नाही. परंतु मानवाला तपश्चर्या करून ज्ञान प्राप्ती करून घेता येते आणि भगवंत सुद्धा प्राप्त होतो. असे सांगून श्री संत गोरोबा कुंभाराचे चरित्र सांगितले.



