*तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या संपन्न….

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अमंलबजावणीकरिता शिक्षकांची क्षमतावृद्धी अत्यावश्यक…!!*
-गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे
नायगाव प्रतिनिधी..दि.(२३)
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणेकरीता शिक्षकांच्या क्षमतावृद्धी होणं अत्यंत त्यावश्यक आहे, तरच येणारी नवीन पिढी अधिक सक्षम बनेल असे मत गट शिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांनी व्यक्त केले. ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड (डायट) तथा पंचायत समिती नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 ची देशभर अंमलबजावणी सुरू झाली असून त्या अनुषंगाने शिक्षकांची क्षमतावृद्धी होणेबाबत राज्यस्तरापासुन तालुकास्तरपर्यंत विविध पातळ्यावर प्रशिक्षणे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा व प्रशिक्षण संस्था (डायट ) नांदेड व पंचायत समिती शिक्षण विभाग नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नायगाव तालुकास्तरीय पाच दिवसीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचा पहिला टप्पा श्रीमती.लताबाई बाबुराव पाटील डि.फार्मशी कॉलेज खंडगाव (बेंद्री) तालुका नायगाव येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.
दिनांक 17 ते 22 फेब्रुवारी या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये संपन्न झालेल्या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी दगडगावे, शिक्षण विस्ताराधिकारी सूर्यवंशी,केंद्रप्रमुख शिवराज साधू, केंद्रप्रमुख राजेश्वर डोमशेर,केंद्रप्रमुख कपिल गारठे व श्रीमती लताबाई बाबुराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश पाटील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले व मान्यवरांसह प्रशिक्षणार्थीं शिक्षक/शिक्षिकांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.झपाट्यानेने बदलणाऱ्या या युगामध्ये शिक्षण क्षेत्रातही अमुलाग्र बदल होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून केंद्रशासन व राज्यशासनाने पूर्वीच्या 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अमुलाग्र बदल करून यावर्षीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 ची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे.
सदरील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा प्रभावी वापर करून क्षमता आधारित अध्ययन निष्पत्ती व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर भर देण्यात आलेला आहे. त्यामध्ये क्षमता आधारित अध्ययन निष्पत्ती,समग्र प्रगती पुस्तक तथा अध्ययन निष्पत्ती व मानके या नवीन विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.त्यासोबतच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा,राज्य अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत तथा शालेय शिक्षण स्तर तसेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यासह क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया, मूल्यांकन संकल्पना मूल्यांकन कार्यनीती,क्षमता आधारित प्रश्न प्रकार तथा प्रश्न निर्मिती कौशल्य आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेणारे समग्र प्रगती पुस्तक अर्थात एच पी सी ही संकल्पना महत्वाची बाब ठरणार आहे.
सदर प्रशिक्षणासाठी प्राथमिक स्तरावर अध्यापन करणाऱ्या जि.प.व खाजगी शाळेतील 160 शिक्षकांचा पहिल्या टप्प्यांमध्ये सहभाग होता. यामध्ये जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेऊन आलेले सुलभक म्हणून सौ. सुनिता देशमुख,स्मिता कुंडलवाडीकर, शरद पूरजवार,संतोष पांचाळ, सखाराम जांभळीकर, त्र्यंबक अप्पा स्वामी नांदगावकर, सदाशिव सोनटक्के व मारुती तमन्ना यांनी यशस्वीपणे काम पाहिले.



