Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
आकोडा टाकून वीज चोरी ; दंड न भरल्याने स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल
नरसी महावितरणाची कारवाई २४२ युनिट वीज चोरीची रक्कम २४,२५० दंड न भरणे पडले महागात

रघुनाथ सोनकांबळे नायगाव ..
नायगाव तालुक्यातील नरसी महावितरण कार्यक्षेत्रातील मौजे रामतीर्थ येथील स्वस्त धान्य दुकानातून आकोडा टाकून वीज चोरी प्रकरण महागात पडले असून २४२ युनिट वीज चोरीप्रकरणी संबंधित दुकानदारावर २४,२५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र ही रक्कम हणमंतराव तोडे यांनी न भरल्याने सहाय्यक अभियंता अक्षय वाकळे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नरसी येथील महावितरण कंपनीच्या वतीने वीज चोरीविरोधात मौजे रामतीर्थ व किनाळा येथे विशेष मोहीम राबवून विजेची चोरी करणाऱ्यांना लंगेहात पकडण्यात आले होते. या मोहिमे दरम्यान २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मौजे रामतीर्थ येथील स्वस्त धान्य दुकानात आकोडा टाकून उघडपणे वीज चोरी सुरू असल्याचे सहाय्यक अभियंता अक्षय वाकळे, श्रीमती वाय. एस. सय्यद व जी. एस. कनगुले यांच्या पथकाच्या निदर्शनास आले. तपासणीदरम्यान सुमारे ५० फूट वायरच्या साहाय्याने २४२ युनिट वीज चोरी होत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी हणमंतराव शंकरराव तोंडे यांच्यावर महावितरण कंपनीने १९,२५० रुपयांचे युनिट मूल्य आणि आकोडा तडजोड शुल्क ५,००० रुपये असा एकूण २४,२५० रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र,गत तीन महिन्यांपासून संबंधिताने दंडाची रक्कम न भरल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कुठेही महावितरणाची विधुत चोरी झाल्यास भोकर येथील पोलीस ठाण्यात तक्रार द्या, या आदेशानुसार नरसी येथील सहाय्यक अभियंता अक्षय वाकळे यांनी १३ मार्च २०२६ रोजी भोकर पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली.



