लोहा तालुक्यातील येळी येथे अवघ्या शंभर ते तिनशे ब्रास मातीच्या परवान्याआड तब्बल हजारो ब्रास मातीचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. दररोज २० ते २५ हायवा गाड्यांद्वारे मातीची खुलेआम वाहतूक होत असताना, संबंधित तलाठी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांची भूमिका संशयास्पद ठरत असून, आर्थिक लाभापोटी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत.
विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर चाललेला उत्खननाचा धंदा महसूल विभागाच्या नजरेआड राहणे अशक्य असताना, एकही ठोस कारवाई न होणे ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असताना, मातीमाफियांचे मात्र फावते असल्याचे चित्र आहे.
या प्रकारामुळे परिसरातील शेतजमिनी, रस्ते व पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जर नियम तोडणाऱ्यांवर कारवाईच करायची नसेल, तर महसूल विभाग नेमका कुणासाठी काम करतो? असा थेट सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी स्वतः लक्ष घालून स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी व बेकायदेशीर येळी येथे चालू असलेले उत्खनन थांबवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.