महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने नागरिकांच्या महसुली अडचणी जागेवर सोडवण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता बहुउद्देशीय सभागृह, तहसील कार्यालयाच्या बाजूस, नायगाव (बा.) येथे होणार आहे.
या शिबिरात ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (N.A.) परवानगी, सनद प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्यांतर्गत प्रकरणांचा निपटारा, ई-मोजणी अर्ज, पी.एम. किसान नोंदणी आदी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच महसूल विभागासोबत कृषी, आरोग्य, वन, पंचायत समिती आदी विभागांच्याही सेवा नागरिकांना उपलब्ध राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. शिबिरासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिराला खा. रवींद्र चव्हाण, आ. राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार डॉ. धर्मप्रिया गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबिराचे आयोजन मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी, मंडळ नायगाव (बा.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.