नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी रोजी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या जागतिक स्तरावरील धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात नांदेडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते श्रावण पाटील भिलवंडे यांनी केले आहे.
देशासह परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त नांदेडमध्ये दाखल होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नांदेडकरांनी स्वयंप्रेरणेने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. गुरु गोविंद सिंग जी यांच्या पावन चरणस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड भूमीत होणारा हा ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम ऐतिहासिक व संस्मरणीय ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घ्यावा, परस्पर सहकार्याने हा सोहळा अभूतपूर्व यशस्वी करावा, असे आवाहनही यावेळी श्रावण पाटील भिलवंडे यांनी केले आहे.