Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगाव ग्रामीण रुग्णालयातील कारभाराचा बोजवारा!  जिल्हा शल्यचिकित्सकांची झाडाझडती; बेजबाबदार अधिकाऱ्यांना खडसावले!

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव….

 

नायगाव ग्रामीण रुग्णालयातील कोलमडलेल्या प्रशासनामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड सुरू आहे. मनमानी कारभार आणि बेजबाबदारपणामुळे वैद्यकीय अधीक्षकांविरुद्ध डॉक्टर आणि कर्मचारी यंत्रणा उठावाच्या भूमिकेत गेली आहे. परिणामी अनेक अधिकारी बदली करून गेले, तर उरलेले दिर्घ रजेवर गेले. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसेवा ठप्प झाली असून, गरोदर माता, दिव्यांग व सर्वसामान्य रुग्ण अक्षरशः हालअपेष्टा सोसत आहेत.
८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पेरके व निवासी वैद्यकीय अधिकारी राजाभाऊ बुट्टे यांनी नायगाव ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून वैद्यकीय अधीक्षक अपर्णा पपुलवाड यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
डॉ. पेरके यांनी ठाम शब्दात चेतावणी दिली — “शासनाने गरीब जनतेसाठी उभारलेली आरोग्य यंत्रणा बेजबाबदारपणाने उध्वस्त होऊ देणार नाही. जबाबदारी न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल!”
भेटीदरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना डॉ. पेरके म्हणाले, “नायगाव रुग्णालयातील विस्कळीत व्यवस्था सुधारण्यासाठी चौकशी सुरू आहे. तातडीने तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, बदली झालेल्या तज्ञ डॉक्टरांना अद्याप मुक्त केलेले नाही.”
गरोदर महिलांचे हाल — आरोग्य यंत्रणेला जाग आणणारे चित्र!
७ नोव्हेंबर रोजी तज्ञ डॉक्टर नसल्याने गरोदर मातांची तपासणी न झाल्याच्या घटनेची दखल घेत, त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना थेट जाब विचारला. तपासणी झाली असा दावा अधीक्षकांनी केला, परंतु “कोण डॉक्टर होते, आणि केव्हा आले?” या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची गडबड उघड झाली.
एक्स-रे साठी शिपायांवर जबाबदारी टाकणाऱ्या ऑपरेटर व डॉक्टरांवर अजूनही कारवाई न झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
 नायगाव ग्रामीण रुग्णालयातील गोंधळ, निष्क्रियता आणि बेजबाबदार कारभारामुळे रुग्णांचे हाल सुरूच — आता जिल्हा प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जाणार का? अशी चर्चा जोरात रुग्णालय परिसरात होत असताना दिसत होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button