Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

महापुरुषांचा अपमान हा अपघात नसतो, तो व्यवस्थेचा चेहरा असतो!

डांगोरी 24 तास या न्यूज पोर्टल चे विशेष संपादकीय…. लेख….. मुख्य संपादक.. रघुनाथ सोनकांबळे

राष्ट्रसंत गाडगेबाबा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक विवेकाचा कणा. स्वच्छता, समता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या थोर संताचा पुण्यतिथीचा दिवसही नायगाव नगरपंचायतीला पवित्र वाटू नये, ही बाब केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायक आहे.
राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात त्यांच्या प्रतिमेजवळ थेट कुत्र्यांसाठी अन्न देण्याचा फलक लावणे हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा म्हणता येणार नाही. हा प्रकार म्हणजे महापुरुषांविषयी असलेली असंवेदनशीलता, अज्ञान आणि बेजबाबदार मानसिकतेचे जाहीर प्रदर्शन आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पुण्यतिथीसारख्या संवेदनशील दिवशी घडतो, यावरून व्यवस्थेला जनभावनांचे कोणतेही भान उरलेले नाही, हे स्पष्ट होते.
आज ‘डॉग फीडिंग’सारख्या उपक्रमांवर प्रश्न उपस्थित करणे हा उद्देश नाही. पशुप्रेमही आवश्यकच आहे. मात्र प्रश्न आहे ठिकाणाचा, वेळेचा आणि विवेकाचा. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या चौकात, त्यांच्या प्रतिमेजवळ, त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी असा फलक लावणे ही कृती जाणीवपूर्वक नसली, तरी ती अक्षम्यच आहे.
महापुरुषांचे पुतळे, प्रतिमा आणि चौक हे शोभेची वस्तू नाहीत. ते समाजाच्या मूल्यांची आठवण करून देणारी प्रतीके असतात. प्रशासनाने जर या प्रतीकांनाच कमी लेखायला सुरुवात केली, तर पुढील पिढ्यांना काय संदेश जाणार? आज गाडगेबाबा, उद्या शाहू–फुले–आंबेडकर… ही घसरण थांबवणार कोण?
या प्रकरणात केवळ फलक हटवून जबाबदारी संपत नाही. दोषी अधिकारी, कर्मचारी आणि निर्णय घेणाऱ्यांवर ठोस कारवाई झाली पाहिजे. अन्यथा ‘चूक झाली’ या ढोबळ सबबीखाली महापुरुषांचा अपमान सवयीचा विषय बनतो, हे प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे.
जिल्हाधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रशासनिक संवेदनशीलता नेमकी कुठे हरवली? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. कारण महापुरुषांचा अपमान हा केवळ एका समाजाचा प्रश्न नसून, तो संपूर्ण समाजाच्या आत्मसन्मानाचा विषय असतो.
राष्ट्रसंत गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छतेसोबतच विचारांची स्वच्छता शिकवली. दुर्दैव असे की, आज त्यांच्या नावाच्या चौकातच प्रशासनाची वैचारिक अस्वच्छता उघडी पडते आहे. ही केवळ एक घटना नाही, तर इशारा आहे—वेळीच शहाणपण न घेतल्यास उद्या जनतेचा संयम सुटल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button