अवसायनात असलेली संस्था, तरीही कोट्यवधींचे स्वस्त धान्य लाटले; नायगाव बा.येथिल रेशन घोटाळ्यावर कोर्टाचा दणका

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव..
“गरिबांसाठी असलेले स्वस्त धान्य कुणाच्या ताटात गेले?” असा संतप्त सवाल उपस्थित करत नायगाव बा.येथील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील गंभीर भ्रष्टाचारावर न्यायालयाने अखेर कठोर भूमिका घेतली आहे. गजानन तमलुरे विरुद्ध सय्यद रहीम व इतर या प्रकरणात न्यायालयाने थेट पोलीस तपासाचे आदेश दिल्याने संपूर्ण प्रकरणात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार गजानन तमलुरे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जानुसार, दत्तात्रय हमाल औद्योगिक सहकारी संस्था, नायगाव ही संस्था दि. ३१ डिसेंबर २०१८ रोजी अवसायनात (लिक्विडेशनमध्ये) काढण्यात आली होती. असे असतानाही दत्तात्रेय हमाल औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन सय्यद रहीम व इतर गैर-अर्जदारांनी संगनमत करून संस्थेच्या नावावर स्वस्त धान्याचा परवाना वापरला.
न्यायालयीन नोंदीनुसार, तत्कालीन सचिव शेषेराव ऐनएलवार(मृत) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बनावट व खोट्या सह्या करून त्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करण्यात आली.
दि. ३१/१२/२०१८ ते ११/०९/२०२४ या कालावधीत दरमहा मोठ्या प्रमाणावर गहू, तांदूळ, डाळी, साखर व गोडतेल उचलण्यात आले. मात्र हे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही; उलट काळ्या बाजारात विकून सदर संस्थेचे चेअरमन सय्यद रहीम यांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण घोटाळ्याची तक्रार करूनही प्रशासनाने डोळेझाक केल्याचे उघडकीस आले आहे.दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार, व दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून संतप्त झालेल्या तक्रारदार गजानन तमलुरे यांनी नायगाव येथील न्यायालयात दि.11/6/2024 रोजी धाव घेतली होती.
या सदर प्रकरणी
न्यायालयाने कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून संस्था अवसानात असतानाही धान्य उचल,बनावट कागदपत्रांचा वापर,शासनाची आर्थिक फसवणूक,स्वस्त धान्याचा काळाबाजार हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे नमूद केले आहे. न्यायालयाने या गंभीर बाबी लक्षात घेत, भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल होण्यास पात्र असल्याचे स्पष्ट करत नायगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कलम १५६(३) अंतर्गत तातडीने सखोल तपास करण्याचे आदेश दि.22/1/2026 रोजी न्यायालयाने दिले आहेत.
गरिबांच्या तोंडचा घास लाटणाऱ्या या रेशन घोटाळ्यात फक्त दत्तात्रेय हमाल औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन सय्यद रहीम व त्यांचे सहकारी यांच्यासह डोळेझाक करणाऱ्या यंत्रणेचीही चौकशी होणार का? असा सवाल आता नायगाव शहरातील नागरिक विचारत असून, न्यायालयाच्या आदेशानंतर तरी प्रशासन जागे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



