Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगावात धाडसी घरफोडी; देवदर्शनाला गेलेल्या कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ९.७० लाखांची रोकड लंपास
वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह,

रघुनाथ सोनकांबळे….
दि. २९ :नायगाव शहरातील व्यंकटेश नगर परिसरात धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली असून, नायगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले माधव कौटकर यांच्या व्यंकटेश नगर येथील भाड्याच्या घरातून चोरट्यांनी सुमारे ९ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
माधव कौटकर यांचे कुटुंब दि. २६ जूनपासून देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात प्लॉट खरेदीसाठी अनेक वर्षे साठवून ठेवलेली सुमारे ९.७० लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
दि. २८ जूनच्या रात्री उशिरा देवदर्शनावरून परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात येताच माधव कौटकर यांनी नायगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला.त्यानंतर दि. २९ जून रोजी श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, नायगाव शहर व परिसरात चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या घरफोड्यांतील अनेक गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झालेला नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
त्यामुळे गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक कमी झाला आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.रात्री उशिरापर्यंत संशयित व्यक्तींचा शहरात मुक्त वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, त्यांच्यावर प्रभावी नजर ठेवण्याची मागणी होत आहे.



