Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

शंभर कोटींचा ‘सीसी रस्ता’ आठ दिवसात तडकला; राजसेतूच्या कामावर भ्रष्टाचाराची छाया?

 अधिकाऱ्यांची मौनसंमती की संगनमत? चौकशी नाही तर आझाद मैदानावर अमरण उपोषणाचा इशारा...

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव……..जनतेच्या कराच्या पैशातून मंजूर झालेल्या शंभर कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी सीसी रस्त्याच्या कामाचा अक्षरशः बट्ट्याबोळ होत असून, काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता तडे जाऊ लागल्याने कंत्राटदार, अधिकारी आणि संबंधित यंत्रणेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नायगाव ते उमरीला जोडणारा राज्य रस्ता क्रमांक २६४ या २९ किलोमीटरच्या रस्त्याचे काम ‘राजसेतू’ कंपनीकडून सुरू असले तरी प्रत्यक्षात दर्जाहीन आणि निकृष्ट कामाचा खेळ सुरू असल्याचा संतापजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महिपाळे यांनी केला आहे.

Img 20260226 Wa0026
Img 20260226 Wa0026

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून मंजूर झालेला हा रस्ता नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी जीवनवाहिनी मानला जातो. उमरी, तळेगाव, बळेगाव, इकळीमाळ, कुंटूर ते नायगाव या गावांना जोडणारा हा रस्ता दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने शासनाने प्रथमच एवढा मोठा निधी मंजूर केला. मात्र, नागरिकांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फेरण्याचे काम राजसेतू कंपनीकडून सुरू असल्याचे चित्र आहे.

आठ दिवसातच तडे; ३० वर्षांच्या आयुष्याचा दावा हवेत

शासनाच्या नियमानुसार सीसी रस्त्याचे आयुष्य किमान ३० वर्षे असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात तयार होत असलेल्या रस्त्याला अवघ्या आठ दिवसांत जागोजागी तडे जात असल्याने कामाच्या गुणवत्तेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार म्हणजे शासनाच्या नियमांची उघडपणे पायमल्ली असून, जनतेच्या पैशाची उघड लूट असल्याचा आरोप होत आहे.
20260107 142415
20260107 142415

जुने मटेरियल वापरून नवा रस्ता? गंभीर आरोप

कुंटूर ते शेळगाव दरम्यान केंद्रीय रस्ते निधीतून एक वर्षापूर्वीच २० कोटी रुपये खर्च करून दर्जेदार काम करण्यात आले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या कामात नवीन मटेरियल न वापरता जुन्याच साहित्याचा वापर केल्याचा धक्कादायक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जर हा आरोप खरा असेल तर हा केवळ निकृष्ट कामाचा नव्हे, तर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा विषय असल्याची चर्चा नागरिकांत रंगली आहे.
महामंडळाचे अधिकारी ‘गायब’; कंत्राटदार मोकाट
या संपूर्ण कामावर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचा एकही जबाबदार अधिकारी फिरकत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अधिकाऱ्यांच्या या संशयास्पद निष्क्रियतेमुळे कंत्राटदार मनमानी पद्धतीने अंदाजपत्रकाला हरताळ फासून काम करत असल्याचा आरोप होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची ही भूमिका केवळ निष्काळजीपणाची नसून, संगनमताची तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
20260107 142312
20260107 142312

मुख्य अभियंत्याकडे तक्रार; आंदोलनाचा इशारा

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महिपाळे यांनी थेट मुंबई गाठत मुख्य अभियंत्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. निकृष्ट कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. गरज पडल्यास मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
कार्यकारी अभियंता संपर्काबाहेर; मौन संशयास्पद
या संदर्भात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुनील ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या या मौनामुळे संशय अधिकच गडद झाला असून, नेमके काय लपवले जात आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

जनतेचा संताप : ‘रस्ता नव्हे, भ्रष्टाचाराचा महामार्ग’

दरम्यान, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, हा रस्ता विकासाचा नव्हे तर भ्रष्टाचाराचा महामार्ग ठरत असल्याची बोचरी प्रतिक्रिया उमटत आहे. शंभर कोटी रुपये खर्चूनही जर आठ दिवस टिकणारा रस्ता मिळणार असेल, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button