Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
देगाव–कुंटूर–कोकलेगाव परिसरात बिबट्याचा वावर; शेतकरी भयभीत, वन विभाग मात्र अनभिज्ञ!

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव…
देगाव व परिसरातील नागरिकांना सतर्क करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दिनांक २९ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास देगाव, कोकलेगाव व कुंटूरच्या शिवेवरील नदी (ओहळ) परिसरात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने संपूर्ण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना बंदिस्त ठेवावे तसेच रात्री बेरात्री एकट्याने फिरणे टाळावे, अशा सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत.
ग्यानबा पाटील शिवार, कुंटूर शिव तसेच ओहळालगतच्या परिसरात सध्या बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून येत असून काही शेतकऱ्यांनी स्वतः डोळ्यांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे. या शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला. मात्र इतकी गंभीर बाब समोर येऊनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अद्याप बिबट्याची कुठलीही ठोस चाहूल न लागणे, हे आश्चर्य व संतापाचे कारण ठरत आहे.
या परिसरात नदीकाठालगत उसाची पिके, दाट लपण व पाण्याचा सहवास असल्याने बिबट्यास लपण्यासाठी व वावरासाठी अनुकूल वातावरण मिळत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. परिणामी मजुरीसाठी जाणारे मजूर भीतीपोटी शेताकडे जाणे टाळत असून शेतीकामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.




