Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
गरिबांचे धान्य ठेकेदारांच्या तिजोरीत! नायगावात स्वस्त धान्य घोटाळ्याचा भडका — प्रसिद्ध ठेकेदार सय्यद रहीम व बंधूवर गुन्हा दाखल

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव…
“गरिबांच्या ताटातले धान्य कुणी पळवले?” या संतप्त सवालाचे उत्तर अखेर न्यायालयाने दिले असून, नायगाव शहरातील नामवंत व ‘प्रसिद्ध’ ठेकेदार सय्यद रहीम सय्यद मीर व त्यांचे छोटे बंधू सय्यद रहेमान सय्यद मीर यांच्या विरोधात स्वस्त धान्य वितरणातील भीषण भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने नायगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अवसायनात गेलेली संस्था, तरीही कोट्यवधींचे धान्य लाटले! गजानन तमलुरे विरुद्ध सय्यद रहीम व इतर या प्रकरणात नायगाव न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेत थेट पोलिसांना तपासाचे आदेश दिले. दत्तात्रय हमाल औद्योगिक सहकारी संस्था, नायगाव ही संस्था दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी अवसायनात (लिक्विडेशनमध्ये) गेली असतानाही, संस्थेच्या नावावर असलेला स्वस्त धान्याचा परवाना बेकायदेशीरपणे वापरून मोठ्या प्रमाणात धान्य उचल करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.
न्यायालयीन नोंदीनुसार, संस्थेचे तत्कालीन सचिव शेषेराव ऐनएलवार (मृत) यांच्या खोट्या व बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्या आधारे शासनाची थेट फसवणूक करण्यात आली.
३१/१२/२०१८ ते ११/०९/२०२४ या कालावधीत दरमहा गहू, तांदूळ, डाळी, साखर व गोडतेल मोठ्या प्रमाणात उचलण्यात आले. मात्र हे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. उलट, काळ्या बाजारात विकून आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतल्याचा ठपका न्यायालयात ठेवण्यात आला.
न्यायालयाचा दणका — पोलिसांना थेट तपासाचे आदेश .तक्रारदार गजानन तमलुरे यांनी दिनांक ११/०६/२०२४ रोजी न्यायालयात धाव घेतली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर कागदपत्रांचा सखोल अभ्यास करताना —
संस्था अवसायनात असतानाही धान्य उचल,
बनावट कागदपत्रांचा वापर,
शासनाची आर्थिक फसवणूक,
स्वस्त धान्याचा काळाबाजार
हे प्रकार प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
त्याआधारे न्यायालयाने दिनांक २२/०१/२०२६ रोजी भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत कलम १५६(३) अंतर्गत नायगाव पोलिसांना तातडीच्या तपासाचे निर्देश दिले.

एफआयआर दाखल — अटकेची शक्यता दाट
न्यायालयीन आदेशानुसार दिनांक २८/०१/२०२६ रोजी नायगाव पोलीस ठाण्यात प्रसिद्ध ठेकेदार सय्यद रहीम सय्यद मीर व त्यांचे बंधू सय्यद रहेमान सय्यद मीर यांच्या विरोधात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड स्वतः करीत असून, आरोपींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



