Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगावकरांना पाण्यासाठी हेलपाटे; ३१ लाखांच्या थकबाकीमुळे जिगळा तलाव पंपगृह सील! डांगोरी २४ तासच्या बातमीनंतर नगरपंचायतीची धावपळ; २० मार्चपर्यंत उर्वरित रक्कम भरण्याचे लेखी आश्वासन

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव..

ऐन सणासुदीच्या काळात नायगाव शहरावर पाणीटंचाईचे सावट दाटले असून तब्बल ३१ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे जिगळा तलाव येथील पंपगृह सील करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुमारे ४० हजार लोकसंख्या असलेल्या शहरातील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागली.
काल, दिनांक २ मार्च रोजी डांगोरी 24 तास या न्यूज पोर्टलने “नायगाव शहराला पाणीटंचाईचा फटका; जिगळा तलाव पंपगृह सील – जबाबदार कोण?” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच नगरपंचायतीची झोप उडाली. बातमीचा प्रभाव दिसून येताच शहरातील सर्व वार्डांत ट्रॅक्टर टँकरद्वारे तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
Img 20260302 Wa0042
Img 20260302 Wa0042
मात्र, ४० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरासाठी ट्रॅक्टर टँकरची तुटपुंजी व्यवस्था कितपत पुरेशी ठरणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. सणाच्या दिवशी का होईना, टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी हा केवळ तात्पुरता तोडगा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
३१ लाखांची थकबाकी; दोन लाख तत्काळ भरले
नगरपंचायतीवर पाणीपुरवठ्याचे २० लाख रुपये थकबाकी व त्यावर १० लाख रुपये दंड असा एकूण ३१ लाख रुपयांचा बोजा असल्याचे समोर आले आहे. यापैकी दोन लाख रुपये तातडीने भरून उर्वरित १८ लाख रुपये (दंड वगळून) २० मार्चपर्यंत भरण्याचे लेखी आश्वासन संबंधित विभागाला देण्यात आले. त्यानंतर जिगळा तलावावरील पंपाचे सील काढण्यात आले.
तथापि, २० मार्चपर्यंत उर्वरित रक्कम न भरल्यास २१ मार्च रोजी पुन्हा पंपगृहाला सील ठोकण्यात येईल, अशी अटही संबंधित विभागाने नगरपंचायतीकडून लेखी स्वरूपात घेतली आहे. नगरपंचायतीनेही ही अट मान्य केली असल्याचे कळते.

या सर्व घटनेला जबाबदार कोण?  ऐन सणासुदीत शहराला पाण्यासाठी वणवण भटकावे लागणे ही प्रशासनाची गंभीर चूक नाही का? ३१ लाखांची थकबाकी इतकी वाढेपर्यंत नगरपंचायत काय करत होती? नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे.

सध्या पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा केला जात असला तरी २० मार्चची मुदत डोळ्यासमोर ठेवून नगरपंचायतीने उर्वरित रक्कम भरली नाही, तर पुन्हा एकदा नायगावकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार का? असा संतप्त सवाल शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button