Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगाव ग्रामीण रुग्णालयात उच्च जोखमीच्या प्रसूतीचे यशस्वी व्यवस्थापन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हनुमंत पाटील यांच्या नेतृत्वात डॉ. राजेंद्र लोंढे यांनी सिजरशिवाय सुखरूप केले बाळंतपण

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव….
शासकीय रुग्णालयांबाबत अनेकदा दुर्लक्ष व अपुऱ्या सेवांची टीका केली जाते. मात्र नायगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र लोंढे व त्यांच्या प्रशिक्षित चमूने आपल्या कार्यक्षमतेतून या टीकेला ठाम प्रत्युत्तर दिले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री रक्तदाबात चढ-उतार असलेल्या एका गर्भवती महिलेचे उच्च जोखमीचे प्रसूती प्रकरण सिजरशिवाय यशस्वीरीत्या हाताळत सुरक्षित प्रसूती करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की, सौ. निकिता अशोक वाघमारे (रा. तुळशी, ता. महाडा, जि. सोलापूर) या माहेरी मौजे किनाळा, ता. बिलोली येथे बाळंतपणासाठी आल्या होत्या. दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास प्रसूती वेदना वाढल्याने त्यांना १०२ रुग्णवाहिकेद्वारे नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय तपासणीत रुग्णाचा रक्तदाब अस्थिर असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत अनेक वेळा तातडीने सिजरचा निर्णय घेतला जातो किंवा रुग्णास उच्चस्तरीय रुग्णालयात हलवले जाते. मात्र परंतु वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हनुमंत पाटील यांच्या मौलिक मार्गदर्शनाने डॉ. राजेंद्र लोंढे यांनी सतत निरीक्षण औषधोपचार, प्रसूती व्यवस्थापन व वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार निर्णय घेत नैसर्गिक प्रसूतीस प्राधान्य दिले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हनुमंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय चमूच्या समन्वयातून सिजर न करता सुरक्षित व यशस्वी प्रसूती पार पडली. सदर महिलेस सुमारे पावणे तीन किलो वजनाच्या निरोगी बाळाचा सुखरूप जन्म झाला. आई व बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा देण्यात आल्या.
या यशस्वी प्रसूतीसाठी डॉ. राजेंद्र लोंढे यांच्यासह सौ. सुधाताई कांबळे व मनीषा हिंगमिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.



