Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
कंत्राटदारांची देयके रोखण्यामागे गैरसमज? आमदार राजेश पवार यांच्यावर आरोप; काम पूर्ण होऊनही निधी अडकला

रघुनाथ सोनकांबळे……
नायगाव तालुक्यातील विविध विकासकामे पूर्ण करूनही कंत्राटदारांना मागील तीन वर्षांपासून देयके न मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, यासंदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देगलुर यांना बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, स्थानिक आ. राजेश पवार यांनी गैरसमजातून या देयकांमध्ये अडथळा आणल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे.
निवेदनानुसार, मे. मोरे कन्स्ट्रक्शन, मे. गार्गी डेव्हलपर्स तसेच मे. नुसरत कन्स्ट्रक्शन या कंत्राटदारांनी विभागाच्या विविध लेखाशिर्षांअंतर्गत रस्ते, इमारत दुरुस्ती व इतर विकासकामे नियमानुसार पूर्ण केली आहेत. संबंधित कामांसाठी आवश्यक तांत्रिक मान्यता शाखा अभियंता व उपविभागीय अभियंत्यांकडून पूर्ण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तसेच, विभागीय व मंडळ कार्यालयाकडून शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असून, निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता मिळालेली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही कंत्राटदारांची बिले प्रलंबित ठेवण्यात आल्यामुळे संबंधितांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, कंत्राटदारांनी निधी उपलब्ध नसतानाही तीन वर्षे कामे पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य केले. या काळात कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार झालेली नाही. मात्र, निधी वितरित करण्याच्या टप्प्यावर लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून देयके रोखण्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, आ. राजेश पवार यांनी गैरसमजुतीतून कंत्राटदारांची देयके थांबविण्याबाबत सूचना केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कंत्राटदारांचे देयक तात्काळ मंजूर करून वितरित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.



