Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
रानसुगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ? पाडसाचा फडशा; शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण..

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव…
नायगाव तालुक्यातील रानसुगाव परिसरात बिबट्याने एका गाईच्या पाडसाचा फडशा पाडल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रानसुगावसह गंगनबीड, तागबीड, पळसगाव, लालवंडी व हिप्परगा या गावांतील नागरिकांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती पसरताच शेतकरी व ग्रामस्थ शेतात जाण्यास तसेच रात्रपाळीच्या कामासाठी बाहेर पडण्यास घाबरत असून जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता कुंटूर पोलीस स्टेशन, नायगाव पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय तसेच वनविभागाला सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले असल्याचे सांगण्यात आले आहे. बिबट्या कोणत्या दिशेने आला, सध्या तो कोणत्या भागात असू शकतो याबाबत तपास व चौकशी सुरू आहे. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.




