अवैधरित्या रेती वाहतूक करणारा हायवा टिप्पर रामतीर्थ पोलीसांच्या पथकाने केरूर जवळ दि.२३ ऑगस्ट रोजी शनिवारी सायंकाळी ५ वाजता च्या सुमारास पकडला असून या प्रकरणी चालकाविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सपोनि विक्रम हराळे यांनी दिली आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचे एक पथक गस्त घालीत असतांना आज शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हायवा टिप्पर क्रं – एम.एच.२६ सी.एच.९६१२ पकडले. टिप्परमध्ये सात ब्रास रेतीचा साठा पोलीसांना आढळून आला. पोलीसांनी पकडलेला हायवा टिप्पर व रेती असा एकूण २५,००००० लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस शिपाई अशोक यरपलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामतीर्थ पोलीस ठाण्यात हायवा टिप्पर चालक साईनाथ बाबाराव मोरे वय ३० वर्ष रा. टाकळी ता.नायगाव जि.नांदेड याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी ज्या टिप्पर मध्ये अवैधरित्या रेती वाहतूक चोरी प्रकरण आढळून आल्यास सदर वाहतूक करणारा चालक व मालक या दोघांवर गुन्हा दाखल करून संबंधित गुन्हा दाखल झालेल्या टिप्परची माहिती जिल्ह्याच्या परिवहन अधिकाऱ्यांना व संबंधित तहसीलदारांना तात्काळ देण्यात यावी. असे असताना रामतीर्थ पोलिसांनी मात्र या चालकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आल्याने उलट सुलट चर्चेला उदान आले आहे. .
या कारवाईमुळे जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे व पथकाचे कौतुक केले आहे.