Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली
रामतीर्थ महसूल समाधान शिबिराचा बोजवारा अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने प्रशासनाची पोलखोल…

यशवंत मोरे शंकरनगर….
रामतीर्थ मंडळ येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान” अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराचा शनिवारी अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी सोडवण्याच्या शासनाच्या उद्देशालाच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तडा गेल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवोदय विद्यालयात या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शिबिराची सुरुवात होताच अनेक विभागांचे अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे शिबिराचा उद्देशच फोल ठरल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली.
शिबिराच्या सुरुवातीलाच तक्रारदार विठ्ठल माने यांनी उपस्थित असलेल्या २६ विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती तपासण्याची मागणी केली. त्यानुसार हजेरी घेतली असता अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देणारेच अधिकारी नसल्याने नागरिकांची अक्षरशः परवड झाली.
“शासन आपल्या दारी” या संकल्पनेतून नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकासह अनेक विभागांचे अधिकारी व कर्मचारी शिबिराकडे पाठ फिरवून बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही कर्मचारी तर अध्यक्षीय समारोप होताच निघून गेल्याने दूरवरून आलेल्या नागरिकांच्या संतापात अधिक भर पडली.
रामतीर्थ मंडळातील रामतीर्थ, हिप्परगा माळ, किनाळा, कामरसपल्ली, चिटमोगरा, अटकळी, टाकळी खुर्द, डोणगाव बु., पाचपिंपळी, रामपूर, केरूर, बिजूर, डोणगाव खुर्द या भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक विविध अर्ज व तक्रारी घेऊन शिबिरात दाखल झाले होते. मात्र अनेक स्टॉलवरील टेबल रिकामे असल्याने नागरिकांना एकमेकांकडेच चौकशी करत ताटकळत उभे राहावे लागले. शेवटी कोणत्याही प्रश्नांचे निराकरण न झाल्याने नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले.
यावेळी किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने, बाबाराव पाटील, हणमंत पाचाळ, जिगळा येथील जाधव, रामतीर्थ येथील कांबळे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ महिला व नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. मात्र जागेवरच समाधान न झाल्याने त्यांनाही रिकाम्या हाताने परतावे लागले.
दरम्यान अध्यक्षीय समारोप करताना तहसीलदार गजानन शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आलेल्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल, असे सांगितले. तसेच शिबिरास गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नियोजनातील घाईगडबडीमुळे येत्या शनिवारी पुन्हा समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मात्र शासनाने नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी सोडवण्याच्या उद्देशाने आयोजित केलेले हे शिबिर प्रत्यक्षात केवळ औपचारिकतेपुरतेच मर्यादित राहिल्याची तीव्र टीका किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने यांनी केली. येत्या शनिवारी होणाऱ्या शिबिराचे काटेकोर नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.



