Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
माहिती अधिकार अर्जाला टाळाटाळ; नायगाव नगरपंचायतीच्या जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

नायगाव विशेष प्रतिनिधी….
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागविलेली माहिती जाणीवपूर्वक न देणे, अर्जदाराला वारंवार हेलपाटे मारायला लावणे व मानसिक त्रास देणे या प्रकरणी नायगाव नगरपंचायतीच्या जन माहिती अधिकारी तसेच अपिलीय अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष रघुनाथ सोनकांबळे यांनी जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन विभाग नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनानुसार, रघुनाथ सोनकांबळे यांनी दिनांक 20 मार्च 2026 रोजी माहिती अधिकार कायद्याच्या कलम 6(1) अंतर्गत नायगाव नगरपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये मार्च 2021 पासून आजपर्यंत नायगाव शहरातील गुंठेवारीसाठी आलेले प्रस्ताव, मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांची यादी व संबंधित माहितीची सत्यप्रत मागविण्यात आली होती.मात्र माहिती अधिकार अधिनियमात नमूद केलेल्या 30 दिवसांच्या मुदतीत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कोणतेही लेखी उत्तर किंवा कारणही कळविण्यात आले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



