Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

बरबडा येथे मातीचोरांचा उच्छाद; 200 ब्रासच्या परवान्यावर 5000 ब्रास उत्खनन — महसूल यंत्रणा गाढ झोपेत!

रघुनाथ सोनकांबळे ……

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे बरबडा येथे गोदावरी नदी पात्राच्या काठावर अवैध माती उत्खननाचा अक्षरशः उच्छाद माजला आहे. फक्त 200 ब्रास माती उत्खननाचा अधिकृत परवाना घेऊन प्रत्यक्षात तब्बल 5000 ब्रास मातीचा उपसा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवस-रात्र तब्बल 25 हायवा वाहनांच्या सहाय्याने चालणाऱ्या या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे.
Img 20260505 Wa0016 1
Img 20260505 Wa0016 1स्थानिकांच्या मते, नदीपात्र दिवसेंदिवस अधिक खोल आणि पसरट होत चालले असून भविष्यात पूरस्थिती आणि जमिनीची धूप यासारखे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या सर्व प्रकाराकडे ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
तक्रारींचा अक्षरशः ढिगारा साचला असतानाही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे “अधिकारी सुस्त आणि मातीचोर मस्त” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
या प्रकरणात काही स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांचा आश्रय असल्याचीही चर्चा रंगत असून प्रशासनावर दबाव टाकून हे अवैध उत्खनन सुरु असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार फक्त महसूल बुडवण्यापुरता मर्यादित नसून प्रशासनाच्या विश्वसनीयतेलाच तडा देणारा आहे.
नागरिकांनी जिल्हाधिकारी तसेच नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी तात्काळ हस्तक्षेप करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button