विद्यार्थ्यांनी मोबाईलवर स्टेट्स ठेवण्यापेक्षा आपले स्टेट्स वाढविण्यासाठी परिश्रम केले पाहिजे – विठ्ठल कांगणे ..

उमरी प्रतिनिधी .दि..(२२)
उमरी येथील कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. 20 ते 24 जानेवारी, 2025 या कालावधीत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न होत आहे. वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त महाविद्यालयात 5 दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दि. 20 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, परभणी येथील स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक विठ्ठल कांगणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव कैलासभाऊ देशमुख गोरठेकर होते. यावेळी मंचावर लाल बहादूर शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, सुभाषराव देशमुख गोरठेकर, उमरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम गाटे, उप प्राचार्य डॉ. विलास गणिपूरकर, नूतन हायस्कूलचे मुख्याध्यापक, यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक, प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि उमरी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.
विठ्ठल कांगणे यांनी आपल्या विनोदी आणि उत्साहवर्धक शैलीत विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर मोठे यश मिळविले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे, गुरुजनांचे नाव होईल असेच वागले पाहिजे. मोबाईलवर स्टेट्स ठेवण्यापेक्षा आपले स्टेट्स वाढविले पाहिजे.” अध्यक्षीय भाषणात कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांनी कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयाच्या वाटचालीबद्दल माहिती दिली व रुसा योजनेंतर्गत महाविद्यालयास 5 कोटी अनुदान दिल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले.याप्रसंगी शासकीय व निमशासकीय नोकरीत वेगवेगळ्या पदांवर निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा आणि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. विठ्ठल कांगणे यांच्या हस्ते ‘माणुसकीची भिंत’ चे उद्घाटन करण्यात आले. त्यापूर्वी कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यानी ‘आनंद नगरी’ चे उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. संभाजी जाधव यांनी, प्रास्ताविक डॉ. गजानन देवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप लाडकर यांनी मानले. कार्यक्रमास नूतन हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, यशवंत हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनी विद्यार्थि व त्यांचा स्टाफ व ईतर नागरिक भरपूर संख्येने उपस्थित होते.



