Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगाव पंचायत समितीला लागला ‘अदृश्य शाप’! तीन महिन्यांत पाच बी.डी.ओ बदल — कारभार ठप्प, नागरिकांच्या नाड्या सुटल्या

 

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव…

 

नायगाव पंचायत समितीचा कारभार नेमका कोणत्या ग्रह-नक्षत्रांनी पछाडला आहे, असा प्रश्न आज तालुक्यातील नागरिक मोठ्या संतापाने विचारताना दिसत आहेत. कारण, संपूर्ण तालुक्याच्या विकासाचा ‘ड्रायव्हिंग सीट’ असलेल्या या समितीत अवघ्या तीन महिन्यांत मुख्य गटविकास अधिकाऱ्यांची तब्बल पाच वेळा अदलाबदल होणे हेच पुरेसे धक्कादायक आहे.

वादांच्या छायेत अधिकारी बदलाचा मॅरेथॉन सिलसिला..

जवळपास तीन वर्ष सेवा करणारे लक्ष्मण वाजे वादांच्या भोवऱ्यात सापडून बदलीवर गेले. त्यांच्या जागी तात्पुरते आलेले संजय मिरजकर 20 दिवसांतच बदलले.
मुख्य पदभार घेऊन आलेले वानखडे तर केवळ एका महिन्यातच ‘रजा’ या नावाखाली नायगाव सोडून गेले आणि आजही परतलेले नाहीत.
यानंतर तात्पुरते ‘फायरब्रिगेड’ म्हणून आणले गेलेले मुखेडचे ढवळे यांनी एका महिन्यातच हात टेकले आणि नायगावचा कारभार सोडून दिला. जिल्ह्यातील अधिकारी नायगावला येण्यास अक्षरशः “नको रे बाबा!” म्हणत असल्याची चर्चा प्रशासनात खुलेपणाने सुरू आहे. अंतिम पर्याय म्हणून किनवटचे सहा महिन्यांत सेवेनिवृत्तीला जाणारे वैष्णव नायगावचा पदभार घेणार असल्याची खबर पसरली आहे.

आमदार पवारांची ‘कार्रवाई’ की प्रशासनाची भीती?
संपूर्ण गोंधळाच्या मुळाशी भाजप आमदार राजेश पवार असल्याचा आरोप तालुक्यात जोरात आहे. तहसील कार्यालय आणि पंचायत समितीतील 11 ते 12 कर्मचाऱ्यांवर केलेल्या त्यांच्या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. काही कंत्राटी कर्मचारी व अभियंते निलंबित झाले.
या घटनेनंतर नायगाव हे अधिकारीांसाठी ‘हाय रिस्क पोस्टिंग’ बनल्याचे बोलले जाते आहे.
गावकऱ्यांचे हाल – घरकुल, शेती, अपंग कल्याण सर्वच कामांचा ठप्प कारभार
समितीत अधिकारीच नसल्याने घरकुल अर्ज, महसुली प्रमाणपत्रे, शेतातील सिंचन समस्यांचे प्रस्ताव, अपंग कल्याण, महिला-बालसंगोपन, पाणीपुरवठा या सर्व कामांवर जाड धूळ साचली आहे.

कर्मचारी नियमांची ओळ दाखवत हातावर हात धरून बसलेत, तर नागरिकांना दररोज पंचायत समितीची धावपळ करावी लागत आहे.
“कुणी ऐकत नाही, कुणी पाहत नाही… नायगावच्या विकासाची फाइल कोणी उचलतच नाही!” अशी हतबल प्रतिक्रिया अनेक नागरिक देत आहेत.
मुख्य अधिकारीशिवाय ‘अनाथ’ झालेली पंचायत समिती….
आज स्थिती अशी की नायगाव पंचायत समितीकडे स्थायी मुख्य अधिकारीच नाही. कारभार तात्पुरत्या स्वरूपात ढकलला जात आहे आणि तालुक्याचा विकास अक्षरशः ‘गुडघे टेकलेला’ आहे.

नायगावच्या विकासाला लागलेला हा ‘शाप’ नेमका कोणाचा?
राजकीय दबाव, प्रशासनाची भीती की अधिकारीवर्गाचा अनुत्साह —
याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

नागरिक मात्र एकच प्रश्न विचारत आहेत :
“अशी पंचायत समिती चालणार किती दिवस? आणि विकासाच्या फाइलांना उभारी देणार नेमकं कोण?”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button