Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

घुंगराळा सेवा सहकारी सोसायटीत प्रजासत्ताक दिनासह सलग तीन वेळा बाबासाहेबांच्या फोटोविना ध्वजारोहण; चौकशीची मागणी…

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव…

घुंगराळा ता.नायगाव येथील सेवा सहकारी सोसायटीमध्ये 15 ऑगस्ट 2025, 17 सप्टेंबर 2025 व 26 जानेवारी 2026 या राष्ट्रीय व संविधानिक महत्त्वाच्या दिवसांमध्ये सलग तीन वेळा ध्वजारोहण करण्यात आले; मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता ध्वजारोहण झाल्याने गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाच्या स्पष्ट आदेशानुसार सार्वजनिक, निमशासकीय व सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रीय सणांच्या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावणे बंधनकारक असताना, संबंधित लोकप्रतिनिधी व संस्थेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सेवा सोसायटीमध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन व उपसरपंच हे पदाधिकारी ध्वजारोहण करत असल्याचे नागरिकांनी काढलेल्या छायाचित्रांमधून स्पष्ट दिसून येते. बाबासाहेबांचा फोटो का लावण्यात आला नाही, असा जाब विचारला असता व्हाईस चेअरमन यांनी “फोटो फुटल्यामुळे ठेवता आला नाही” असे उत्तर दिले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही हाच खुलासा करण्यात आला होता आणि यंदाही तेच कारण पुढे करण्यात आल्याने नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. आज प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतीत आयोजित ग्रामसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सोसायटीत सलग तीन वेळा बाबासाहेबांचा फोटो न ठेवता ध्वजारोहण होणे ही साधी चूक नसून जाणून-बुजून केलेली कृती असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावर उपस्थितांसमोर पदाधिकाऱ्यांनी “अपमान करण्याचा हेतू नव्हता, फोटो अचानक फुटल्यामुळे ठेवता आला नाही” असे स्पष्टीकरण दिले. मात्र या उत्तराने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
भारताच्या संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेबाबत अशी निष्काळजी किंवा वारंवार दुर्लक्षाची भूमिका ही केवळ प्रशासकीय चूक नसून सामाजिक सलोख्यास धक्का देणारी असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button