Latest Newsआपला जिल्हानांदेड

शासकीय रुग्णालयातील बहिणीच्या मृत्यूने संताप; भावाचा आत्मदहनाचा इशारानिष्काळजीपणाचा आरोप; दोषी डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

१७ सप्टेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी आत्मदहन करण्याचा इशारा..

रघुनाथ सोनकांबळे..

नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल केलेल्या बहिणीचा कथित निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत तिच्या भावाने संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी आत्मदहन करणार, असा इशारा रातोळी (ता. नायगाव) येथील बालाजी श्रावण गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
गायकवाड यांच्या निवेदनानुसार, त्यांची बहीण शिल्पा भीमानंद वाघमारे (वय ३०) यांना १३ ऑगस्ट २०२६ रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये दाखल करण्यात आले होते. १४ ऑगस्ट रोजी सकाळी उपचारादरम्यान चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप असून, इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही क्षणांत शिल्पा यांच्या तोंडातून फेस आला आणि त्या पलंगावरून खाली पडल्या, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यानंतर उपस्थित डॉक्टर, नर्स व नागरिकांनी त्यांना पुन्हा पलंगावर झोपविले. त्यावेळी डॉक्टरांनी ‘इंजेक्शनने काही होत नाही, घाबरू नका’ असे सांगून कुटुंबीयांना दिलासा दिला; मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिल्पा यांना पुढील उपचारासाठी वॉर्ड क्रमांक १९ मध्ये हलविण्यात आले. मात्र, काही वेळाने वैद्यकीय पथकाने कुटुंबीयांना रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या घटनेनंतर मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची भेट घेतली. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर १५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता शिल्पा वाघमारे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी सकाळी वॉर्ड क्रमांक १६ व १९ मध्ये कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कथित निष्काळजीपणामुळेच बहिणीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप बालाजी गायकवाड यांनी केला आहे.

या प्रकरणाची नोंद नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

मागणीवर ठोस कारवाई न झाल्यास १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला असून, निवेदनाच्या प्रती संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. शवविच्छेदन व पोलिस तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button