Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

शेतकऱ्यांना गंडा घालून दोन नामांकित व्यापारी फरार? लाखो रुपयांचे सोयाबीन विकून पोबारा; पेरणी तोंडावर, शेतकरी हवालदिल

रघुनाथ सोनकांबळे…….

नायगाव शहरातील दोन नामांकित आडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांचे सोयाबीन खरेदी करून पैसे न देता फरार झाल्याची चर्चा सध्या शहरात मोठ्या चवीने रंगली आहे. पेरणीचे दिवस तोंडावर आले असताना शेतकरी मात्र आपल्या हक्काच्या पैशासाठी व्यापाऱ्यांच्या शोधात भटकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नायगाव शहर हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या बाजारपेठेमुळे ओळखले जाते. मात्र अनेक शेतकरी भविष्यात सोयाबीनला अधिक भाव मिळेल, या अपेक्षेने खाजगी आडत व्यापाऱ्यांकडे आपला माल अनामत स्वरूपात ठेवतात. गरजेनुसार थोडीफार उचल घेत शेतकरी भाव वाढण्याची वाट पाहत असतात. मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेत शहरातील दोन प्रसिद्ध व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचे सोयाबीन कोट्यवधी रुपयांत विकून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी ठेवल्याची जोरदार चर्चा आहे.
सदर व्यापारी कधी पंढरपूरला, कधी पुण्याला तर कधी मुंबईला असल्याचे सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. परिणामी अनेक शेतकरी हैराण झाले असून आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर खरीप हंगामातील पेरणी येऊन ठेपली आहे. बी-बियाणे, खत, औषधे खरेदीसाठी पैशांची अत्यंत गरज असताना व्यापारी भेटत नसल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. अनेक शेतकरी दिवसेंदिवस व्यापाऱ्यांच्या संपर्काची वाट पाहत बसल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, काही काळापूर्वी कुष्णूर एमआयडीसी परिसरातही अशाच प्रकारे एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे सोयाबीन व चना खरेदी करून करोडो रुपयांत विक्री केली होती. त्यानंतर तो फरार झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आता त्याच धर्तीवर नायगाव शहरातही प्रकार घडल्याची चर्चा रंगू लागली आहे.
या दोन व्यापाऱ्यांची नावे शहरात मोठ्या प्रमाणात चर्चिली जात असली तरी भीतीपोटी अनेक शेतकरी उघडपणे बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित व्यापाऱ्यांचा शोध घ्यावा . अशी मागणी मात्र दबक्या आवाजात जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button