तालुक्यातील मांजरम, कुंटूर, नायगाव, घुगराळा, सावरखेड व अंतरगाव येथील सहा शाळांमध्ये कार्यरत असलेल्या कला, क्रीडा व कार्यानुभव विषयाच्या १८ शिक्षकांचे मानधन मागील जून महिन्यापासून थकीत आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ मानधन न मिळाल्याने या शिक्षकांच्या कुटुंबांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली असून शासनाच्या उदासीन कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Screenshot 20251219 184946 Youtube
शासनाच्या धोरणानुसार आठवी ते सहावी वर्गामध्ये शंभरपेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, शाळांमध्ये नियमितपणे अध्यापन करूनही या शिक्षकांना वेळेवर मानधन दिले जात नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी गंभीर बनली आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार अशा मूलभूत गरजांसाठी शिक्षकांना कर्ज काढावे लागत असल्याचे चित्र आहे.
Screenshot 20251219 185433 Youtube
एकीकडे ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’चा गवगवा, तर दुसरीकडे शिक्षकांचे मानधन महिनोन्महिने रखडवून ठेवणे, हा शिक्षण व्यवस्थेवरील काळा डाग असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. शिक्षण विभाग व संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे शिक्षकांचे हाल वाढत असून, याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, संबंधित शिक्षकांनी शासनाकडे तातडीने थकीत मानधन त्यांच्या खात्यावर जमा करण्याची ठोस मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही शिक्षकांकडून दिला जात आहे. शासन याकडे गांभीर्याने पाहणार की पुन्हा एकदा शिक्षकांच्या संयमाची परीक्षा पाहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.