Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगावात युरियावर ‘संरक्षित’ काळाबाजार होलसेल–किरकोळ व्यापारी, खत कंपन्या मोकाट; कृषी विभाग केवळ तमाशागीर

 

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव….

 

नायगाव तालुक्यात रब्बी हंगाम सुरू असतानाच युरिया खतावर उघडपणे काळाबाजार सुरू असून, हा प्रकार आता चोरीछुपा न राहता प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असल्याची तीव्र चर्चा शेतकरी वर्गात होत आहे. शासननिश्चित दर केवळ कागदावरच उरले असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट केली जात आहे.
होलसेल व्यापारी जाणीवपूर्वक साठा लपवून धरत असून, “माल नाही”चा गाजावाजा करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. त्याच वेळी काही निवडक दुकानदारांकडे मात्र खत उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. या दुहेरी धोरणामुळे किरकोळ विक्रेत्यांवर जादा दराने खत उचलण्याचा दबाव निर्माण होत असून, अखेर हा आर्थिक बोजा शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे. व्यापाऱ्यांतील दरवाढीवरून सुरू असलेली धुसफूस ही लुटीच्या संगनमताचीच पावती देणारी ठरत आहे.
Screenshot 20260113 203821 Youtube
Screenshot 20260113 203821 Youtube
या संपूर्ण गैरप्रकारात बड्या खत निर्मिती कंपन्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मागणी प्रचंड असताना पुरवठा मुद्दाम कमी ठेवून बाजार अस्थिर केला जात आहे. वितरण यंत्रणा कोलमडलेली असताना कुठेही जबाबदारी निश्चित केली जात नसल्याने दलाल, साठेबाज आणि बडे व्यापारी मालामाल होत आहेत, तर शेतकरी मात्र कर्ज, चिंता आणि नुकसान याच्या गर्तेत अडकत चालला आहे.
युरिया नाही या सबबीखाली लिक्विड युरियाची जबरदस्तीची विक्री हा तर कळस ठरत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे सर्रास दुर्लक्ष करून शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत ‘लिकींग’ पद्धतीने विक्री केली जात आहे. गरज नसतानाही महागडे पर्यायी खत गळ्यात घालण्याचा हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या लुटीची नवी आणि धोकादायक पद्धत आहे.

 

Screenshot 20260113 203829 Youtube
Screenshot 20260113 203829 Youtube
या साऱ्या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाचे अधिकारी मात्र पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. साठा तपासणी, दरनियंत्रण, काळाबाजार रोखणे या बाबींवर प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने “हे सगळे वरच्या पातळीवरून संरक्षित आहे का?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. “वरून आदेश नाहीत” ही नेहमीची ढाल पुढे करत अधिकारी आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. युरिया वेळेवर आणि योग्य दरात न मिळाल्यास रब्बी पिकांचे अपरिमित नुकसान होणार असून, नायगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांकडून पुढील मागण्या तीव्र होत आहेत—
Screenshot 20260113 203737 Youtube
Screenshot 20260113 203737 Youtube
तालुक्यातील सर्व युरिया साठ्याची तात्काळ चौकशी करावी.होलसेल व किरकोळ विक्रेत्यांवर एकाच वेळी कठोर कारवाई .खत कंपन्यांच्या पुरवठा व वितरण धोरणांची उच्चस्तरीय चौकशी
लिक्विड युरियाच्या बेकायदेशीर विक्रीवर तात्काळ बंदी आणावी. नायगावातील युरिया लूट रोखण्यासाठी शासन खरोखर पुढे येणार की कृषी विभागाच्या निष्क्रियतेच्या आड लपून साठेबाजांना मोकळे रान देणार? याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक अटळ असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button