Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नरसी ग्रामपंचायतीच्या जागेवरील कथित अतिक्रमणाविरोधात यादव सोनकांबळे यांचे अर्ध नग्न अवस्थेत बेमुदत आमरण उपोषण*

 

*शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी*

नायगाव…….

नायगाव तालुक्यातील मौजे नरसी येथील ग्रामपंचायत मालकीच्या गट क्रमांक २२२ व २२३ मधील शासकीय जागेवर कथितरित्या झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते यादव सोनकांबळे यांनी नायगाव तहसीलसमोर दि. १ जून २०२६ पासून बेमुदत अर्धनग्न अवस्थेतील आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
उपोषणकर्ते यादव सोनकांबळे यांनी प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे की, नरसी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गट क्रमांक २२२ व २२३ मधील शासकीय जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे. या जागेवर मोठमोठ्या व्यावसायिक इमारती उभारण्यात आल्या असून त्या भाड्याने देऊन कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ घेतला जात आहे. त्यामुळे शासन व ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात संबंधित अतिक्रमणधारकांसह तत्कालीन व विद्यमान जबाबदार व्यक्तींनी संगनमत करून शासकीय मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढल्याचेही सोनकांबळे यांनी म्हटले आहे.
उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या मागण्यांमध्ये गट क्रमांक २२२ व २२३ मधील संपूर्ण अतिक्रमणाचे मोजमाप करून ते तात्काळ हटविणे,
संबंधित अतिक्रमणधारकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे, शासनाची फसवणूक व महसुली नुकसान प्रकरणाची सखोल चौकशी करणे तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, नरसी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील कथित अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून या प्रकरणाकडे तालुका व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही.
या आंदोलनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

*उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या*
नरसी येथील गट क्रमांक २२२ व २२३ मधील कथित अतिक्रमण तात्काळ हटवावे.
संबंधित अतिक्रमणधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
शासनाच्या महसुली नुकसानीची चौकशी करावी.
दोषी अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
ग्रामपंचायत मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button