Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
भर उन्हाळ्यात ‘वृक्षारोपणाचा तमाशा’ ; नायगाव नगरपंचायतीच्या अजब कारभारावर नागरिकांचा संताप..

रघुनाथ सोनकांबळे नायगाव..
नायगाव नगरपंचायतीचा अजब व गोंधळलेला कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शहरात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत असताना नगरपंचायतीकडून मात्र भर उन्हाळ्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाच्या विविध योजनांअंतर्गत नांदेड–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नायगाव हद्दीत सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे चोरीस गेलेल्या बसस्थानकासमोरील जागेत हे वृक्षारोपण सुरू असल्याने येणारे-जाणारे प्रवासी नगरपंचायतीच्या या कारभाराकडे आश्चर्याने पाहत आहेत. अनेक प्रवासी नगरपंचायतीची थट्टा उडवत असून प्रशासनाच्या विवेकबुद्धीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

नायगावसारख्या मोठ्या शहरात प्रवाशांसाठी साधा निवारा किंवा सावलीची व्यवस्था नाही. आता तर दहावीच्या परीक्षेचा काळ असल्याने तळपत्या उन्हात प्रवासी, महिला व शाळकरी विद्यार्थी उभे राहून बसची वाट पाहतात. मात्र या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांच्या योजना राबविण्याचा घाट घालण्यात येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
विशेष चर्चा तर होणारच.. नांदेड जिल्ह्यातील नवतरुण नेतृत्व म्हणून ओळख असलेले आणि काँग्रेस पक्षाच्या राजकीय परंपरेचे वारसदार असलेले खा. याच नायगाव शहरातील व नगरपंचायतीवर एक हाती सत्ता असलेल्या घराण्यातील असल्याने अशा ठिकाणी प्रवाशाची एवढी दयनीय अवस्था असणे हा आश्चर्याचा विषय असल्याची चर्चा सुरू असून ही परिस्थिती नायगाव शहरासाठी लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, या वृक्षारोपणासाठी डिसेंबर महिन्यातच महामार्गालगत खड्डे खोदण्यात आले होते. मात्र तब्बल तीन महिन्यांनंतर, ऐन मार्च महिन्यात व कडाक्याच्या उन्हाळ्यात झाडे लावण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अशा तळपत्या उन्हात ही झाडे जिवंत राहतील का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
याहूनही गंमत म्हणजे पुढे कामगार कर्मचारी झाडे लावत आहेत आणि मागे शेळ्या-बकऱ्या ती झाडे चघळून टाकत असल्याचे दृश्य परिसरात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी झाडे आधीच वाळलेली दिसत असून त्यांचे संगोपन करण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचीही चर्चा आहे.
“शासनाची योजना आहे म्हणून ती कशीही राबवायची आणि लाखो रुपयांचा चुराडा करायचा,” असा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात पाणीटंचाई, स्वच्छतेचे प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था अशा अनेक समस्या असताना नगरपंचायतीने हा नवा उपद्व्याप ओढवून घेतल्याची टीका होत आहे.
नागरिकांच्या मते, वृक्षारोपण खरोखर करायचेच असेल तर ते पावसाळ्याच्या सुरुवातीपासून डिसेंबरपर्यंत करणे आवश्यक होते. त्या काळात लावलेली झाडे जगण्याची शक्यता अधिक असते आणि शहराच्या सौंदर्यातही भर पडते. परंतु ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक त्रस्त असताना झाडे लावण्याचा निर्णय कोणाच्या डोक्यातून आला, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.




