Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

रात्री दोन वाजता मोठी पोलिस धाड — ३५ जुगारी ताब्यात!

उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांची गुप्त कारवाई; लाखो रुपयांची रोकड व मुद्देमाल जप्त

 

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव….

नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रातोळी-माहेगाव शिवारात उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी ५ नोव्हेंबरच्या पहाटे सुमारे दोन वाजता गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून तब्बल ३५ जुगारांना जुगार खेळताना पकडले. या धाडीत लाखो रुपयांची रोकड व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नायगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही धाड पूर्णपणे गोपनीयतेने पार पडली. विशेष म्हणजे, या कारवाईबाबत नायगाव पोलिसांना पूर्वसूचना न देता उपविभागीय अधिकारी यांनी रामतीर्थ-मुखेड येथील पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ही मोहीम राबवली. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
सदर ठिकाणी देगलूर, मुखेड, मुक्रमाबाद या परिसरातील नामवंत जुगारी वारंवार येत असल्याची माहिती होती. मात्र, स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने जुगार अड्डा फोफावत असल्याचे समोर आले आहे.
धाडीत पकडलेल्या ३५ जुगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पकडलेल्यांमध्ये काही प्रसिद्ध व्यावसायिक व मोठे जुगारी असल्याने या प्रकरणात “मोठी डील” होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
धाडीत लाखो रुपयांची नगदी, पत्ते, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. जुगार अड्ड्याचा मुख्य आयोजक आणि मालकाला अटक करण्याची शक्यताही पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई आतापर्यंतची नायगाव परिसरातील सर्वात मोठी जुगारविरोधी धाड ठरली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button