Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
निर्दयी मुलाचा राक्षसी अवतार! भिक मागून पोट भरणाऱ्या बापाची दगडाने ठेचून हत्या; नायगाव हादरले…

रघुनाथ सोनकांबळे
दारूच्या नशेत बेभान झालेल्या मुलाने चार घरे भिक मागून त्यालाच जगवणाऱ्या जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना नायगाव शहरात घडली असून संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या अमानुष घटनेमुळे नायगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले आहे.
ही थरारक घटना बुधवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री साईबाबा मंदिर परिसरातील अझरी नगरच्या पाठीमागील वस्तीत राहणारे मारुती माणिका गटलेवार (वय ७०) आणि त्यांचा मुलगा नामदेव मारुती गटलेवार (वय ३५) हे दोघे एकत्र राहत होते. नामदेव हा पूर्वी एका दुकानात नोकरी करत होता; मात्र दारूच्या व्यसनाधीनतेमुळे त्याने नोकरी गमावली. त्याच्या सततच्या छळ आणि मारहाणीला कंटाळून पत्नीने लहान मुलांसह घर सोडले होते.
यानंतर वडील आणि मुलगा दोघेच राहू लागले. मयत मारुती हे भोळे आणि मंदबुद्धीचे असल्याने लोक सांगतील ती कामे करून पोट भरत होते. परिसरातील काही कुटुंबीय त्यांना अन्न देत असत. स्वतः उपाशी राहूनही दारू पिऊन आलेला मुलगा उपाशी झोपू नये म्हणून ते भिक मागून आणलेले अन्न त्याच्यासाठी जपून ठेवत असत—पण हाच मुलगा त्यांच्या जीवावर उठेल, अशी कुणालाही कल्पना नव्हती.

दररोज दारूच्या नशेत घरी येणारा नामदेव “मला जेवायला काय आणले?” या कारणावरून वडिलांशी वाद घालत, शिवीगाळ व मारहाण करत असे. मात्र प्रेमळ बाप सर्व सहन करत मुलाला पोटभर जेवू घालत होता.
दरम्यान, बुधवारी दि. १ मार्च रात्री पुन्हा दारूच्या नशेत आलेल्या नामदेवने नेहमीप्रमाणे वाद घातला. वडील शांत बसले असतानाच संतापाच्या भरात त्याने जवळील मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला. या भीषण हल्ल्यात मारुती गटलेवार यांचा जागीच मृत्यू झाला.



