Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगाव ग्रामीण रुग्णालयाचा धक्कादायक कारभार!खाजगी वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशात रात्री १० वाजता शवविच्छेदन; आरोग्य विभागाचा भोंगळपणा पुन्हा चव्हाट्यावर

रघुनाथ सोनकांबळे….
नायगाव ग्रामीण रुग्णालयातील बेजबाबदार कारभाराचा आणखी एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. ११ जून) उघडकीस आला आहे. टेंभुर्णी येथील वडजे नामक ३५ वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन चक्क रात्री सुमारे १० वाजता एका खाजगी वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, यामुळे नायगाव ग्रामीण रुग्णालयासह संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन गृहात वीजपुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याने किंवा कार्यरत नसल्याने खाजगी वाहन शवविच्छेदन गृहासमोर उभे करून त्याच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे शवविच्छेदन ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून न्यायव्यवस्थेशी संबंधित अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. अशा प्रक्रियेसाठी पुरेसा प्रकाश, आवश्यक उपकरणे, सुरक्षित वातावरण आणि शासकीय नियमांचे काटेकोर पालन अपेक्षित असते. मात्र नायगाव ग्रामीण रुग्णालयात या मूलभूत बाबींचाच अभाव असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
प्रश्नांची मालिका; उत्तर कोण देणार?
शवविच्छेदन गृहासाठी स्वतंत्र इमारत आणि सुविधा असताना वाहनाच्या प्रकाशाचा आधार का घ्यावा लागला?शवविच्छेदनाच्या वेळी वीजपुरवठा का नव्हता?जनरेटर किंवा पर्यायी प्रकाशयोजना उपलब्ध नव्हती का?रात्री उशिरा शवविच्छेदन करण्याची एवढी घाई का करण्यात आली?अशा परिस्थितीत करण्यात आलेले शवविच्छेदन न्यायवैद्यकीय निकषांनुसार ग्राह्य धरले जाणार का?कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी डॉ. कादरी यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतली होती का?वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपर्णा पपुलवाड यांना या घटनेची माहिती होती का?जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास याबाबत अवगत करण्यात आले होते का?जर माहिती होती, तर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पर्यायी व्यवस्था का केली नाही?या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात असून प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

गैरकारभाराच्या तक्रारींकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष?……….नायगाव ग्रामीण रुग्णालयातील गैरव्यवस्थेच्या तक्रारी नवीन नाहीत. मागील अनेक महिन्यांपासून रुग्णसेवा, मनुष्यबळ, औषधसाठा, उपकरणे आणि विविध प्रशासकीय त्रुटींबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. मात्र संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्य विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे..परिणामी आज परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की मृतदेहाच्या शवविच्छेदनासारखी अत्यंत संवेदनशील प्रक्रिया देखील वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशात करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.आरोग्य विभाग झोपेत आहे का?



