Latest Newsआपला जिल्हानांदेड
नांदेड जिल्ह्यात गॅस वितरणात शिस्त; घरपोच डिलिव्हरी सक्तीची, e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन…

रघुनाथ सोनकांबळे..
नांदेड –. जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस एजन्सी धारक व सेल्स ऑफिसर्स यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गॅस वितरणाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून प्रशासनाने कडक सूचना जारी केल्या आहेत.

बैठकीत सर्व गॅस एजन्सींना ग्राहकांना केवळ नोंदणीकृत पत्त्यावरच घरपोच सिलिंडर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत एजन्सीवरच सिलिंडर देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच ग्राहकांना डिलिव्हरीसंदर्भात अडचण आल्यास संबंधित तालुक्यातील पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
गॅस एजन्सींवर होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी एजन्सीवर जाऊन सिलिंडर घेऊ नये, तर बुकिंगनंतर घरपोच सेवा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ग्राहकांनी आपले e-KYC (आधार प्रमाणीकरण) पूर्ण करणे आवश्यक असून, ही प्रक्रिया मोबाईलद्वारे सुलभपणे करता येणार आहे. यासाठी “Aadhaar Face RD (Early Access)” अॅप डाउनलोड करून संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत अॅप (IndianOil ONE, Hello BPCL, HP Pay) वापरून चेहरा स्कॅनद्वारे e-KYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



