Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
करपा रोगाने नायगाव परिसरातील हळद धोक्यात; शेकडो हेक्टरवरील उत्पादन घटण्याची भीती, कृषी विभागाच्या निष्क्रियतेवर शेतकऱ्यांचा संताप…

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव…
नायगाव परिसरात हळदीच्या पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने हजारो हेक्टरवरील हळद उत्पादन धोक्यात आले आहे. यंदा चांगला दर आणि अनुकूल जमीन पाहता शेतकऱ्यांनी दरवर्षीपेक्षा दुपटीने हळदीची लागवड केली होती. मात्र, करपा रोगाने शेतकऱ्यांचा आशेवर अक्षरशः पाणी फेरले असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

नायगाव परिसरातील जमीन हळद पिकासाठी अत्यंत सुपीक व अनुकूल मानली जाते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून बियाणे, खत, औषधे आणि मजुरीवर लाखो रुपये खर्च केले. परंतु करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळदीच्या पानांवर करपा डाग पडून झाडे वाळू लागली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “या रोगामुळे उत्पादन तर घटणारच, पण आम्ही टाकलेला बियाण्याचा खर्चही निघेल की नाही, याची शक्यता उरलेली नाही,” अशी व्यथा एका शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे हळद हे साधारणतः दहा महिन्यांचे पीक असताना यंदा करपा रोगामुळे ते दोन महिने आधीच काढणीस येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हळदीचे खोंब पूर्ण वाढ न झाल्याने वजन आणि गुणवत्ता दोन्हीवर परिणाम होत असून उत्पादनात मोठी घट मात्र निश्चित मानली जात आहे.

दरम्यान, या गंभीर परिस्थितीत कृषी विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नायगावात शहरात तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित यंत्रणा अस्तित्वात असूनही हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतेही मार्गदर्शन शिबिर, जनजागृती किंवा रोगनियंत्रणाबाबत विशेष मोहीम राबवण्यात आलेली नाही. “जर कृषी विभागाने वेळेवर शिबिर घेऊन शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली असती, तर कदाचित या रोगावर नियंत्रण मिळवता आले असते,” असा आरोप शेतकरी करत आहेत अधिक धक्कादायक बाब म्हणजे काही शेतकरी स्वतः नायगाव तालुका कृषी कार्यालयात जाऊन रोगाबाबत माहिती विचारण्यासाठी गेले असता संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक मार्गदर्शन न करता उडवाउडवीची उत्तरे देऊन पळवाटा काढल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाच्या उदासीनतेचाही सामना करावा लागत आहे.




