दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी शेतकऱ्यावर मात्र वातावरण बदलामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचे मोठे संकट……, शेतकरी चिंतेत

डांगोरी 24 taas विशेष……
नायगाव तालुक्यात वातावरणातील बदलामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण क्षेत्रच कीडग्रस्त होवू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. फुलकळीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकावरच कीड आल्याने शेंगा फुलण्याचे परिणामी उत्पन्न घटण्याचे संकट उभा राहणार आहे.

मूळातच मान्सून उशिरा आल्याने पेरण्या उशिराने झाल्या. सोयाबीन क्षेत्रात त्यामुळे घट झाली. भुईमूग, उडीद, मूग याचे क्षेत्र वाढले. ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी गडबडीत सोयाबीन पेरणी केली. त्यानंतर मान्सून वर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी पंधरा दिवस उशिरा पेरणी केली.आता जवळपास एका महिन्याचे पीक झाले आहे. फुलकळी सुरू असल्याची अवस्था आहे.परंतु गेली पंधरा दिवस झाले पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही.
ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे पाने खाणाऱ्या अळीची वाढ झपाट्याने होवू लागली आहे. या अळीस स्पोडॉप्टर (तंबाखूवरील पाने खाणारी अळी) असे म्हणातात. ही अळी बहुभक्षी असून विविध प्रकारच्या वनस्पतीवर उपजीविका करते.सोयाबीनच्या एका झाडावर पस्तीस ते चाळीस अळ्या हल्ला करताना दिसत आहेत. ही अळी पानाच्या खाली सुमारे ३५० अंडी घालते. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने पसरू लागला आहे.
पाने खाण्यामुळे हरित अन्नद्रव्यच तयार होवू शकत नसल्याने भरगच्च बियाणांच्या शेंगांच लागणे मुश्किल झाले आहे.यातील बहुतांश क्षेत्र प्रादुर्भावाने बाधित झाले आहे. कृषी विभागाने याची पाहणी करून शेतकऱ्यांना उपाय योजना सुचवणे गरजेचे आहे.



