
रघुनाथ सोनकांबळे…..
गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा माजी सभापती श्रावण भिलवंडे यांनी केला यथोचित सन्मान .. महाआरती करून बाप्पाला दिला निरोप
नरसी येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिमय संगीत सोहळ्याच्या माध्यमातून माजी सभापती तथा भाजपा नेते श्रावण भिलवंडे यांनी नरसी येथील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार-सन्मान करत अभिनव उपक्रम राबवला.पारंपरिक वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण करीत हर्षउल्हासात निघालेल्या मिरवणूकीने येणाऱ्या श्री गणरायांची माजी सभापती श्रावण भिलवंडे यांनी तेजोमय महाआरती देखील केली.हजारो गणेशभक्तांच्या जल्लोषपूर्ण सानिध्यात संपन्न झालेला हा कौतुकास्पद सन्मान सोहळा प्रचंड लक्षवेधी ठरला.
“गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या” च्या भावाविवश गजरात लाडक्या गणरायांना नरसी येथे शनिवारी उत्साहात निरोप देण्यात आला.नरसी जुनेगांव, बजरंग नगर, बुरुड गल्ली, बालाजी नगर, दत्तनगर, शामनगर सह सर्व गणेश मंडळाच्या भव्य व आकर्षक श्रीमूर्तीची असंख्य अबालवृद्ध गणेशभक्तांच्या सानिध्यात नरसी चौरस्त्यावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.

नरसी येथील गणेश मंडळानी डीजे मुक्त वातावरणात बाप्पाला निरोप दिला.श्री विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यासह ढोल, ताशा, टाळ, मृदूंग याला प्राधान्य देण्यात आले.भजनी मंडळानी मिरवणुकीत रंगत भरली.महिला भगिनींनी घातलेली फुगडी लक्षवेधी ठरली.गगनचुंबी भगवे ध्वज व गुलालाच्या मुक्त उधळणीने सर्वत्र केसरी माहोल दिसून आला.यंदाच्या विसर्जन सोहळ्यात सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो माजी सभापती श्रावण भिलवंडे यांचा संगीतमय स्वागत उपक्रम.येथील बिलोली रोडलगत उभारलेल्या संगीत मंचावर एकापेक्षा एक सरस भक्तिमय रचना नृत्यासह सादर करत कलावंतांनी गणेशभक्तांची दाद मिळवली.याच मंचावर माजी सभापती श्रावण भिलवंडे यांनी सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान केला.


जल्लोषपूर्ण मिरवणूकीने येणाऱ्या श्री गणेशाची भक्तीभावाने महाआरती करून “पुढच्या वर्षी लवकर या” असे साकडे घालत माजी सभापती तथा भाजपा नेते श्रावण भिलवंडे यांनी नरसी नगरीतील गणरायाना भक्तिमय निरोप दिला.
अनंत चतुर्दशीचे औचित्य साधत माजी सभापती श्रावण भिलवंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमास गणेशभक्तांसह नागरिकांचा देखील प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भक्तिमय कलाविष्काराने भारलेल्या मंचावर एकीकडे गणाधीपती गणरायाच्या भक्तीची संगीतमय साधना अन दुसरीकडे तमाम गणेश मंडळाच्या सेवेकरी पदाधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा व परिश्रमाचा यथोचित गौरव अशा परिपूर्ण सोहळ्याच्या आयोजनातून माजी सभापती श्रावण भिलवंडे यांनी तमाम गणेश भक्तांसह सर्व नरसीकरांची मने जिंकली.




