Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगाव स्वस्त धान्य भ्रष्टाचार प्रकरण : आरोपींना अटीसह अटकपूर्व जामीन

घुनाथ सोनकांबळ
नायगाव..
स्वस्त धान्य वितरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाल्यानंतर, अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटी व शर्थीसह अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन तमलुरे यांनी दत्तात्रेय हमाल औद्योगिक सहकारी संस्था यांच्या अंतर्गत चालणाऱ्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक ९० मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नायगाव न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) अन्वये तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची दखल घेत नायगाव न्यायालयाने दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी नायगाव पोलीस ठाण्यास आरोपी संस्थेचे चेअरमन सय्यद रहीम व त्यांचे बंधू रहेमान सय्यद मीर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर अटकेची शक्यता निर्माण झाल्याने आरोपी चेअरमन व ठेकेदार सय्यद रहीम यांनी बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी फौजदारी जामीन अर्ज क्रमांक १४/२०२६ दाखल केला होता.
या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने अर्जदार व सरकारी पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद सखोलपणे ऐकून घेतला. त्यानंतर दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी न्यायालयाने आरोपी सय्यद रहीम व रहेमान सय्यद मीर यांना अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपींवर कडक अटी लादल्या असून, आरोपींनी नायगाव पोलीस स्टेशनला दर दोन दिवसांनी हजेरी लावणे बंधनकारक राहील, तसेच तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणे आवश्यक राहील. याशिवाय तपासासाठी जेव्हा जेव्हा पोलिसांकडून बोलावण्यात येईल, तेव्हा आरोपींनी उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारे फिर्यादी किंवा पुराव्यांमध्ये छेडछाड करणार नाही, अशी सक्त ताकीदही न्यायालयाने दिली आहे.



