Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली
मालगुजारी तलाव घाणीत बुडाला, नगरपरिषद निष्क्रिय आठ दिवसांत स्वच्छता नाही तर कचरा थेट नगरपरिषद कार्यालयात टाकण्याचा इशारा

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव…
बिलोली शहरातील ऐतिहासिक मालगुजारी तलाव परिसर सध्या कोंबडीचे पीस, मांसकचरा, सडलेली घाण व प्लास्टिक कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये अक्षरशः गुदमरून गेला आहे. शहराच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या या तलावाची अशी दुर्दशा होत असताना, बिलोली नगरपरिषद प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत निष्क्रिय असल्याचा गंभीर आरोप संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तलाव परिसरात उघड्यावर कोंबडी कापून मांस विक्री सुरू असून, त्यातून निघणारा संपूर्ण कचरा थेट तलावाच्या काठावर व पाण्यात फेकला जात आहे. परिणामी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डास, माश्या, कुत्रे व डुकरे यांचा उच्छाद वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असताना, याला जबाबदार कोण? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
या गंभीर प्रकाराविरोधात लक्ष्मीकांत कलमुरगे व साईनाथ खंडेराय यांनी नगरपरिषद प्रशासनास लेखी निवेदन देत आठ दिवसांची अंतिम मुदत (अल्टिमेटम) दिली आहे. या कालावधीत मालगुजारी तलाव परिसराची संपूर्ण स्वच्छता, मांसकचऱ्याची योग्य विल्हेवाट तसेच अनधिकृत कोंबडी विक्रीवर ठोस कारवाई करण्यात आली नाही, तर तेथील साचलेला घाण व कचरा गोळा करून तो थेट बिलोली नगरपरिषद कार्यालयात टाकण्याचा आंदोलनात्मक इशारा त्यांनी दिला आहे.

स्वच्छतेच्या नावाखाली केवळ कागदी योजना व फोटोसेशनपुरतेच मर्यादित राहणाऱ्या प्रशासनाने मालगुजारी तलावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने हालचाल न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.




