Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
खैरगाव पुलाजवळ भीषण अपघात; 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू …दुचाकी 60-70 फूट खोल खड्ड्यात;
मृत तरुण निर्मल येथील असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

रघुनाथ सोनकांबळे….
नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरगाव पुलाजवळ शनिवारी (दि. 19 सप्टेंबर) रात्री भीषण अपघात होऊन एका अंदाजे 30 ते 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून, तो निर्मल (तेलंगणा) येथील रहिवासी असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खैरगाव पुलापासून काही अंतरावर रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यात एका झाडाला मोटरसायकल आदळलेल्या अवस्थेत आढळून आली. दुचाकीचा क्रमांक TS 18 50 54 असा असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची तीव्रता एवढी होती की दुचाकी रस्त्यावरून घसरत सुमारे 60 ते 70 फूट खोल खड्ड्यात जाऊन पडल्याचे दिसून आले.

दरम्यान, रविवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीने 102 क्रमांकावरून या घटनेची माहिती नायगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच नायगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात येण्याची प्रक्रिया सुरू असून, मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक पाहणीत हा अपघात शनिवारी रात्रीच झाला असावा आणि अपघातात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास नायगाव पोलीस करीत आहेत. मृताची ओळख पटविल्यानंतरच घटनेबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.
.



