Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. मीनाक्षी  कागडे राष्ट्रवादीच्या वाटेवर? नायगावच्या राजकारणात खळबळ…

 

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव……

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड वेगाने सुरू असून आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्यांचा पक्षप्रवेश सातत्याने होत आहे. लोकप्रिय नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भक्कम स्थान निर्माण केले असून ‘एक नंबरचा पक्ष’ म्हणून तो पुढे येत असल्याचे चित्र आहे.
अशातच माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. (डॉ.) मीनाक्षी शिवाजी कागडे व डॉ. शिवाजी कागडे यांचे सुभाषनगर परिसरात वाढलेले राजकीय संपर्क, भेटीगाठी आणि हालचाली पाहता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा नायगाव व परिसरातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात डॉ. मीनाक्षी कागडे व डॉ. शिवाजी कागडे यांनी नायगाव तालुक्यातील खेडोपाड्यात फिरून सक्रिय सहभाग घेतला होता. प्रचारात त्यांनी झोकून देत काम करत विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.
डॉ. मीनाक्षी कागडे या 2012 साली बरबडा गटातून कै. बापुसाहेब गोरठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी बरबडा सर्कलमध्ये विकासकामांना गती देत ठोस व दीर्घकालीन कामे केली, हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यामुळे नांदेड जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे.
2017 मध्ये उमरा सर्कलमधून त्यांनी पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढवली. स्वतःच्या मेहनतीने सुमारे सहा हजार मते मिळवूनही तत्कालीन काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्यांना अल्प फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
2025 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी डॉ. मिनलताई खतगांवकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली. नायगाव येथील जयराज पॅलेसमध्ये ऐतिहासिक मेळावा आयोजित करून त्यांनी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले होते.
अंजना हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेमुळे डॉ. कागडे दाम्पत्याचा जनसंपर्क अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संभाव्य प्रवेशामुळे पक्षवाढीस निश्चितच मोठे बळ मिळेल, असा राजकीय जाणकारांचा सूर आहे.
काँग्रेस पक्षात असताना डॉ. मीनाक्षी कागडे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये विविध पदांवर प्रभावीपणे काम केले आहे. उच्चशिक्षण, समाजकार्य, आरोग्यसेवा आणि राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शाहू-फुले-आंबेडकर विचारांना मानणाऱ्या अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घड्याळ’ लवकरच कार्यकर्त्यांसह पुन्हा हातात बांधली जाईल, अशी जोरदार चर्चा सध्या नायगाव तालुक्यात सोशल मीडियावर रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button