नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास नांदेड मनपा प्रशासन सपशेल अपयशी

खा.रवींद्र चव्हाण यांचा घणाघात;काँग्रेसच्या तीव्र आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद..
नांदेड प्रतिनिधी. दि..(३)- नांदेड शहरवासीयांना पिण्याचे पाणी, रस्ते, दिवाबत्ती, स्वच्छता यासह अनेक मुलभूत सुविधा देणस महानगर पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून विकास कामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी येवूनही विकास कामांचा बोजवारा उडाला आहे, असा घणाघाती आरोप खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी सोमवारी महानगरपालिकेसमोर झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या तीव्र आंदोलनप्रसंगी केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांचे विविध प्रश्न व नांदेड मनपाच्या बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध सोमवारी महानगर पालिकेसमोर शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी खा.रवींद्र चव्हाण यांनी मनपा प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर सडकून टीका केली.ते म्हणाले, शहरातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, शहर स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडाला असून जागोजागी कचर्यांचे ढिगारे साचले आहेत, दूर्गंधी पसरली आहे.
मालमत्ताधारकांकडून वर्षभराची पाणीपट्टी वसुल केली जाते, परंतु आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर पाणी, स्वच्छता याकडे लक्ष देणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जात आहे. अमृत योजने अंतर्गत मनपाला 165 कोटी रुपयांचा निधी मिळाला, परंतु हा पैसा गेला कुठे? या प्रश्नाचे उत्तर मनपा प्रशासनाने दिले पाहिजे. तीन वर्षांपासून प्रशासकीय राज सुरु असून अधिकार्यांची मनमानी सुरु आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ट्रॅफिक सिग्नलचे नियोजन नाही. नांदेड हे ट्रॅफिकचे माहेरघर बनले आहे.
खा.रवींद्र चव्हाण यांनी मनपा प्रशासनासह महाराष्ट्र सरकारवरही तोफ डागली. शेतकर्यांच्या प्रश्नांकडे या सरकारचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकर्यांना पीक विमा वेळेवर मिळत नाही, कर्जमाफी दिली जात नाही. कृषीपंपासाठी वीज जोडणी ऐवजी सोलार पंपाची सक्ती केली जात आहे. याकडे आपण राज्य शासनाचे लक्ष्य वेधले, परंतु शासन निर्णय घेत नाही. हे सरकार शेतकर्यांचे, सर्वसामान्यांचे नाही. नागरिकांच्या हितासाठी सरकारच्या या धोरणाविरुद्ध काँग्रेस यापुढेही लढा सुरुच ठेवणार आहे.स्थानिक नेत्यांमध्ये पक्षांतरासाठी रस्सीखेच सुरु आहे, नांदेड हा काँग्रेसचा गड असून स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचा हा गड अबाधित राहील, असा ठाम विश्वास खा.रवींद्र चव्हाण यांनी व्यक्तकेला. जनतेच्या प्रश्नांसाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहात आवाज उठविण्यासाठी मी सदैव सज्ज आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हाणमंत पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, श्याम दरक,केदार पाटील साळुंके,महेश देशमुख तरोडेकर,अॅड. सुरेंद्र घोडजकर, राजेश पावडे,श्रावण रॅपनवाड,मसुद अहेमद खान,आनंद चव्हाण, दत्ता मामा येवते,बाबासाहेब शिंदे, प्रताप देशमुख बारडकर, संदीपकुमार देशमुख, प्रफुल्ल सावंत,रहिम खान,सुरेश हाटकर, भुजंग कसबे,डॉ.जगदीश पुयड,माधव पवळे,गणेश ढगे,सुधाकर सोनसळे,डॉ.रेखाताई चव्हाण,डॉ.करुणाताई जमदाडे, यांच्यासह शहर व ग्रामीणचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खा.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.



